पंचगंगा नदी प्रदूषणबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक

पंचगंगा नदी प्रदूषणबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक

जिल्हाधिकारी कार्यालयात पंचगंगा नदी प्रदूषणबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत आज आढावा बैठक घेतली. यावेळी खालील विषयांवर सविस्तर चर्चा करून तात्काळ उपायोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.
१) पंचगंगा प्रदूषणाबाबत कायमस्वरूपी आराखडा करण्याबाबत सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. महापालिकेच्या 96 एमएलडी पाण्यापैकी 91 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करुन पंचगंगेत सोडले जाते. त्याच पध्दतीने पंचगंगा नदीकाठावर असणाऱ्या ग्रामपंचायती आणि इचलकरंजीमधील औद्योगिक कारखाने यांनीही सांडपाण्यावर प्रकिया प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. यावर कालबध्द कार्यक्रम करावा. इचलकरंजीमध्ये डाईंग युनिट घरोघरी आहेत. यामधून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर काय प्रक्रिया करता येईल. क्लस्टर पध्दतीने हे पाणी साठवून उचलता येईल का याबाबतचा विस्तृत आराखडा नगरपालिकेने तयार करावा.
२) नदीकाठावर असणाऱ्या ग्रामपंचायतींनीही स्वच्छ भारत मिशनअंतर्गत प्राप्त झालेला यावर्षीचा निधी केवळ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावरच खर्च करावा. पंचगंगेच्या आजूबाजूला उचगाव, गांधीनगर, तळंदगे, पाचगाव अशा गावांसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने प्रकल्प करावा. त्यासाठी दीड कोटी मंजूर करण्यात आले आहेत. महिन्याभरात डीपीआरचे काम पूर्ण करावे. पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी सर्व यंत्रणेने प्रयत्न करावेत.
३) घरोघरी प्लास्टिकच्या पिशव्यांमधून दूध पोहचवण्यात येत असते. या पिशव्यांबाबत इको सिस्टीम काय करता येईल याबाबत दूध उत्पादक संस्थांची जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेवून त्यांच्याकडून नियोजन आराखडा घ्यावा.
आज पासून नवीन वर्षाला सुरवात होत आहे, आज पासून पंचगंगा नदी प्रदूषित होणार नाही असा संकल्प आपण सर्वांनी करूयात. कोल्हापूरला स्वच्छ आणि सुंदर बनवूयात!
बैठकीला, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी रवींद्र आंधळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, उदय गायकवाड, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक पाटील, इचलकंरजी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर,प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, इचलकंरजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर आदी उपस्थित होते.