कोल्हापूर पोलीस दलामध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या वाहनांचे लोकार्पण

कोल्हापूर पोलीस दलामध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या वाहनांचे लोकार्पण

आज गुडीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कोल्हापूर पोलीस दलामध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.
कोल्हापूर पोलिस दलातील पोलिसांना दिवस आणि रात्र गस्तीसाठी वाहनांची आवश्यकता ओळखून कोल्हापूर जिल्हा नियोजन निधीतून १ कोटी ६८ लाख रुपयांच्या 16 चारचाकी तर 20 दुचाकी वाहने आज कोल्हापूर पोलीस दलाला प्रदान करण्यात आली आहेत.
गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी आणि पीडितांना तात्काळ मदत मिळावी या उद्देशाने ‘डायल 112’ ही संकल्पना महाराष्ट्र पोलीस दलाकडून राबविण्यात येते. या मोहिमेच्या अंतर्गत कोल्हापूर पोलीस दलाला आज ही वाहने सुपूर्द करण्यात आली आहेत.
कोल्हापूर पोलीस दलातील बंधू-भगिनींना ही वाहने दिवस आणि रात्रीच्या गस्तीसाठी उपयोगी पडणार असून शहरातील अडीचशे ठिकाणी क्यूआर कोड सिस्टिम कार्यान्वित करण्यात आली आहे. या ठिकाणी जाऊन गस्तीवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सदर स्कॅनर स्कॅन करून त्यांच्या गस्तीसंदर्भातील माहिती मुख्य कार्यालयामध्ये पोहचवली जाते.
शहर आणि जिल्ह्यात कुठेही एखादी अनुचित घटना घडत असेल तिथे तात्काळ पोलिसांना दाखल होण्यासाठी आणि पीडित व्यक्तीला वेळेत तात्काळ मदत मिळावी या उद्देशाने ही वाहने आज प्रदान करण्यात आली आहेत.
यावेळी, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपाधीक्षक गृह सुनीता नाशिककर, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, इचलकरंजी पोलीस उपाधीक्षक बाबुराव महामुनी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत व कोल्हापूर पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.