Image

गोकुळ’ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी विविध संस्थांनी 34 प्रश्‍न विचारले आहेत. यामध्ये संघाच्या गलथान कारभारामुळे साधारण 50 कोटी 25 लाख 1 हजार 466 रुपयांचा व्यवहार संशयास्पद असल्याचे दिसत आहे. सभासदांनी विचारलेल्या प्रश्‍नांची दखल घेऊन त्याबाबतचे सविस्तर खुलासे संचालक मंडळाने सर्वसाधारण सभेत करावेत, असे पत्र ‘गोकुळ’च्या अध्यक्षांना दिले आहे.

पत्रात 34 प्रश्‍नांचा तपशील दिला आहे. यात वार्षिक ताळेबंदात बल्क कुलरची आरंभी शिल्‍लक, नवीन बल्क कुलर खरेदी, अनुदानित बल्क कुलरशी संबंधित 6 कोटी 86 लाख 47 हजार 811 रुपयांची रकमेचा गैरवापर झाल्याचे म्हटले आहे. गोकुळ शॉपीत किती रकमेचा अपहार झाला, कधीपासून सुरू आहे याबाबत प्रश्‍न विचारण्यात आला आहे. संघात होणार्‍या संभाव्य नोकर भरतीचे निकष काय असून यासाठी शासनाकडून मान्यता घेतली आहे का, अशी विचारणा करण्यात आली आहे. महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यातून पुरवलेल्या पशुखाद्याची येणेबाकी किती असून बंद संस्थेकडील येणेबाकी वसुलीबाबत काय कारवाई केली, असा प्रश्‍न करण्यात आला आहे.

संघाच्या काही बँकांत बिनव्याजी रकमा पडून आहेत. त्यावर व्याज मिळत नसताना होणार्‍या नुकसानीस जबाबदार कोण? ठराविक बँकेत मोठी रक्‍कम वापर न करता वर्षभर ठेवण्याचा संचालक मंडळाचा उद्देश काय, याचा खुलासा संचालक मंडळाने करण्याची त्यांनी मागणी केली आहे. संघाने प्रसिद्धी व जाहिरातीसाठी दोन कोटींची तरतूद केली होती. प्रत्यक्षात अहवाल सालात 7 कोटी 2 लाख 65 हजार 796 रुपये खर्च करण्यात आले आहेत. या खर्चास सहकार खाते व शासनाची मान्यता घेतली होती का? जर नसेल तर खर्च वसुलीबाबत कोणती कारवाई करणार, याचा खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली आहे. व्यवस्थापन विषयक प्रशिक्षणासाठी संचालक मंडळाने सपत्नीक दौरा केला. त्या खर्चास मान्यता घेतली आहे का, अशी विचारणा करण्यात आली आहे.

सभेची वेळ का बदलली?

‘गोकुळ’ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा प्रतिवर्षी एक वाजता होत असते. परंतु, 55 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सकाळी 11 वाजता बोलवण्याचे कारण काय? संघाचे कार्यक्षेत्र जिल्हा असताना सभासद सभेसाठी उपस्थित राहू नयेत यादृष्टीने आयोजन केले आहे का? तालुकावार सभांचे नियोजन संचालक मंडळाकडून एक वाजता होते, तर वार्षिक सभेची वेळ बदलण्याचे कारण काय, असा प्रश्‍न विचारण्यात आला आहे.

तिसंगी येथील भेसळीचे काय?

संघाच्या शाखेत तिसंगी येथे भेसळीचा प्रकार उघडकीस आला होता. याबाबत दूध संघाने कोणती कारवाई केली? भेसळीच्या प्रकारामुळे सभासदांचे व प्राथमिक दूध संस्थांचे जे नुकसान झाले आहे, त्याची नुकसानभरपाई संघ व्यवस्थापनाने दिली का, याची विचारणा करण्यात आली आहे.

संघाचे लेखापरीक्षण एकाच कुटुंबातील व्यक्‍तीकडे कसे?

संघाचे अंतर्गत लेखापरीक्षण व वैधानिक लेखापरीक्षण एकाच कुटुंबातील व्यक्‍तींकडून करून घेतल्याचे वार्षिक अहवालात दिसते. सहकार कायद्याने अंतर्गत लेखापरीक्षण व वैधानिक लेखापरीक्षण एकाच कुटुंबातील व्यक्‍तींकडे सोपवता येते का? 2016-17 या वर्षाचे वैधानिक लेखापरीक्षण केलेल्या लेखापरीक्षकाकडून यापूर्वी किती वर्षे अंतर्गत व वैधानिक लेखापरीक्षण करून घेतले आहे, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

टँकर भाड्याने घेताना जाहिरात दिली जाते का?

गोकुळ शिरगाव, नवी मुंबई(वाशी) व पुणे येथे दूध वाहतुकीसाठी संघ मालकीचे टँकर्स वगळता उर्वरित 100 टँकर भाड्याने घेत असताना त्याची जाहिरात दैनिकात देऊन निविदा मागवल्या जातात का? निविदेमधील अटींचे पालन करूनच टेंडर मंजूर केले जाते का? अशा टेंडरधारकांची यादी प्रसिद्ध करावी व महत्त्वपूर्ण अटींची माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.

पोटनियम दुरुस्ती नियमानुसार आहे का?

संघाने उपविधी दुरुस्तीचा प्रस्ताव ठेवला आहे. यात संचालक मंडळ सदस्यामध्ये क्रियाशील संस्था सभासदांनी निवडलेल्या प्रतिनिधींमध्ये तीन संचालकांची वाढ करण्याचा प्रस्ताव आहे व दुरुस्तीच्या कारणात सहकारी कायद्यातील कलमांचा वापर केला आहे तो योग्य आहे का? सर्वसाधारण गटातील प्रतिनिधी संख्या वाढवण्याचे कारण काय? याचा खुलासा संचालक मंडळाने करण्याची मागणी करण्यात आली आहे.

September 14, 2017

“गोकुळ” मध्ये चालले आहेत कोट्यवधींचे गैरव्यवहार

गोकुळ’ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी विविध संस्थांनी 34 प्रश्‍न विचारले आहेत. यामध्ये संघाच्या गलथान कारभारामुळे साधारण 50 कोटी 25 लाख 1 हजार 466 रुपयांचा व्यवहार…
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email