Shrawan Tire and Service Center Kolhapur

गेल्या महिन्या मध्ये कुठल्या तरी दैनिकात फार सुंदर आणि हृदयस्पर्षी बातमी वाचली. आणि परवा परिसरातून प्रवास करत असतांना त्याचा प्रत्यक्ष अनुभव देखील आला.

फुलेवाडी पहिल्या बस बसस्टॉपजवळ श्रवण टायर अँड सर्व्हिसिंग सेंटर नावाचे साधारणसे दिसणारे एक दुकान आहे. मात्र या दुकान मालकाची आणि दुकानात काम करणाऱ्या मुलांची गाथा असाधारणच म्हणता येईल.

श्रावण टायर या दुकानाचे मालक महेश शामराव सुतार हे स्वतः एम.ए.बी.पी.एड आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यावर नौकरी न मिळाल्याने त्यांनी आपल्या वडिलांच्या दुकानात पडेल ते काम करायला सुरवात केली. कालांतराने त्यांना या व्यवसायात गती आली आणि आपल्या व्यवसायात इतरांना नौकरी देतांना मूकबधिर, अपंग व मतिमंदांना प्राधान्य द्यायचे त्यांनी ठरवले.

संभाजी रामचंद्र दिवसे, अभय गणेश केसरकर, अनिल मोहन खटावकर, अमिर गुलाब खान, संकेत सपकाळे, सुजित सुतार, किसन मुरलीधर कदम व ओंकार राजू मोरे या गतीमंद, मतिमंद, मूकबधिर अपांग मुलांना त्यांनी आपल्या कडे नौकरीची संधी देऊन या मुलांना पंक्चर काढणे आणि गाडी दुरुस्तीच्या काहीश्या अवघड कामाचे प्रशिक्षण देखील दिले.

आज दुकानातली सर्व कामे ही मुले आनंदाने करतात. कधीही कामाला दांडी मारत नाहीत, कामात चूक करत नाहीत; काम करताना तोंडात तंबाखू, मावा, पानपराग असली भानगड करत नाहीत. सुट्टी झाल्यावर कुठले वेसण करत नाहीत. आपली मुलं कामात रमलेली बघून या मुलांच्या घरच्यांना संतोष आहे. कळत न कळत ही मुलं देखील आनंदी असावीत.

एका सुशिक्षित बेरोजगाराने आठ मतीमंद मुलांना सोबत घेऊन केलेल्या यशस्वी वाटचालीची हि झुंज अतिशय प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे. धडधाकट आणि सुद्न्य कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन उद्योग चालवण्यसाठी देखील कौशल्य लागते. मतीमंद, गतिमंद आणि मुकबधीर मुलांना सोबत घेऊन उद्योग चालविण्यासाठी आत्मगत जिद्द, संयम आणि बांधिलकीची प्रामाणिक भावन हेच भांडवल असावे लागते.

विपरीत परिस्थितीला जीद्धीने आणि मेहनतीने तोंड देणे ह्यालाच जगण्याची कला म्हणतात. स्वतः अडचणीन वर मात करत गरजूंना मदतीचा हात देणे हीच माणुसकीची ओळख. आणि या भावनेचा प्रत्यय आपल्याला आयुष्यात पाऊलो-पाऊली येत असतो…   फक्त मन जागरूक असायला हवे.

February 1, 2018

श्रवण टायर अँड सर्व्हिसिंग सेंटर, फुलेवाडी पहिला बस बसस्टॉप सुंदर आणि हृदयस्पर्षी गोष्ट!

गेल्या महिन्या मध्ये कुठल्या तरी दैनिकात फार सुंदर आणि हृदयस्पर्षी बातमी वाचली. आणि परवा परिसरातून प्रवास करत असतांना त्याचा प्रत्यक्ष अनुभव देखील आला. फुलेवाडी पहिल्या बस…