छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १४७ वी जयंती

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १४७ वी जयंती

आदर्श राज्यकर्ते व सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते, सर्व सामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाचे नवे जीवन देणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १४७ व्या जयंती निमित्त आज कोल्हापुरातील कसबा बावडा येथील लक्ष्मीविलास पॅलेस या त्यांच्या जन्मस्थळी जाऊन त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
छत्रपती राजर्षी शाहु महाराजांनी अवघ्या ४८ वर्षांच्या अल्प जीवनकाळात साहित्य, कला, क्रीडा, शिक्षण, व्यापार, शेती सुधारणा, उद्योगधंदे, जलप्रकल्प उभारणी अशा विविध क्षेत्रांमध्ये अजोड व क्रांतिकारक कामगिरी केली आहे.
सामाजिक सुधारणांबरोबरच राजर्षी शाहू महाराज यांनी शेती व उद्योगधंदयांना प्रोत्साहन दिले, अनेक कृषी व औद्योगिक प्रदर्शने भरविली, कोल्हापुरात कारखानदारीचा पाया रचला, ‘शाहू मिल’ ची स्थापना करून आधुनिक वस्त्रोद्योगास चालना दिली.
महाराजांनी बांधलेले राधानगरीचे धरण कृषी क्षेत्रात कायापालट करणारा उपक्रम ठरला. शेतीविषयक धोरणे राबवून त्यांनी कोल्हापुर सुजलाम्‌-सुफलाम्‌ करून टाकले.
१८९८ साली आलेल्या प्लेगच्या आजारावर मात करण्यासाठी शाहू महाराजांनी त्याकाळात, नागरिकांना आयसोलेशन आणि क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला. अंधश्रद्धेचा पगडा आलेल्या समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन पटवून देण्यासाठी महाराजांनी प्लेगची लस पहिल्यांदा स्वत: टोचून घेतली.
राजर्षी शाहू महाराजांनी घेतलेल्या अनेक समाजउपयोगी कार्यांमुळेच कोल्हापूर हे ‘विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांची नगरी’, मल्लविद्येची पंढरी’ आणि ‘कलानगरी’ म्हणून नावारूपास आले.
महाराजांनी घेतलेले अनेक क्रांतिकारक निर्णय व कल्याणकारी हुकूम आजही समाजाला मार्गदर्शक आहेत. असे लोककल्याणकारी राजे, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना मानाचा मुजरा!