७२ व्या प्रजासत्ताक दिन

७२ व्या प्रजासत्ताक दिन

७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज कोल्हापूरात पालकमंत्री म्हणून ध्वजारोहण केले. आजही आपण त्याच उत्साहाने आणि आनंदाने देशभर हा आनंदाचा दिवस साजरा करत आहोत. #RepublicDay
ज्यांच्या त्यागातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, त्या थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या, देशभक्तांच्या, क्रांतीकारकांच्या आणि शहिदांच्या प्रती मी प्रथम आदर व्यक्त करतो आणि सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो!
कोल्हापुरातील सर्व नागरिक,सेवाभावी संस्था, प्रशासन विशेषतः आरोग्य विभाग, पोलीस आणि सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या सर्वांचे विशेष आभार व्यक्त करतो. कोरोनावर मात करण्यासाठी आपण सर्वानीच अहोरात्र प्रयत्न करून जिल्ह्याला सुरक्षित ठेऊन ‘आम्ही कोल्हापूरी-जगात भारी’ ही उक्ती सार्थ ठरवली आहे.
जिल्ह्यात आज अखेर ३ लाख २६ हजार ७७३ स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ४९ हजार ८५७ पॉझीटिव्ह रूग्णांपैकी ४८ हजार ७६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ९६.४ टक्के इतके रिकव्हरीचे प्रमाण असून राज्यात जिल्हा अव्वल स्थानावर आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोवीशिल्डच्या लसीकरण मोहिमेत जिल्ह्यातील ८४८ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. यामध्ये ५७२ महिलांचा तर २७६ पुरुषांचा समावेश आहे. ही कोरोना प्रतिबंधक लस सुरक्षित आणि उपयुक्त असल्याने जिल्ह्यात लसीकरणाची ही मोहीम यशस्वी होईल, असा मला विश्वास आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर महाविकासआघाडी सरकारची वाटचाल सुरू आहे.
राज्य शासनाने राज्यातील आर्थिकदृष्टया अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करणारी साधी, सोपी, सरळ, सुलभ अशी “महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना” आणून या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे.
शिवभोजन योजना अंमलात येवून १ वर्ष पूर्ण झाले असून एक वर्षाच्या कालावधीमध्ये जिल्ह्यात ३७ शिवभोजन केंद्रे सुरू झाली असून आतापर्यंत सुमारे १० लाख लोकांनी शिव भोजन थाळीचा लाभ घेतला आहे.
कोरोना परिस्थितीमुळे सद्या फक्त ५ रूपयामध्ये ही थाळी देण्यात येत असून शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेचा समाजातील तळागाळातील व सामान्य जनतेस निश्चितपणे फायदा होत आहे.
जिल्ह्याचा औद्योगिक विकास व्हावा, तरूणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी नवीन औद्योगिक वसाहती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नजीकच्या काळात कोल्हापुरात नव्या ३५ उद्योगांची वाढ झाली असून या उद्योगांत २६१ कोटींची गुंतवणूक असून, ४ हजार ९२७ रोजगाराची निर्मिती होणार आहे.
येत्या काळात कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून विविध लोकोपयोगी योजना राबविण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून कोल्हापूर जिल्ह्याची वैभवशाली आणि गौरवशाली परंपरा कायम ठेऊया.
जयहिंद! जय महाराष्ट्र!
– ना. सतेज (बंटी) डी. पाटील
     पालकमंत्री, कोल्हापूर
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email