राज्यातील गृहरक्षक दलाच्या विविध समस्या आणि विविध मागण्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक

राज्यातील गृहरक्षक दलाच्या विविध समस्या आणि विविध मागण्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक

आज राज्यातील गृहरक्षक दलाच्या विविध समस्या आणि विविध मागण्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक घेण्यात आली. यावेळी खालील सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
१. विविध कारणांनी अपात्र असलेल्या गृहरक्षक दलाच्या जवानांना (होमगार्ड्सना) पुन्हा कामावर सामावून घेण्याबाबत गृहरक्षक दलाने परिपत्रक काढले होते. परंतु त्या परिपत्रकाची माहिती सर्वांना मिळाली नाही. त्यामुळे ते परिपत्रक सर्व जिल्ह्यांना पुन्हा काढण्यात यावे. त्यानंतर प्रधान सचिव यांनी तपासून त्याबाबत त्वरित निर्णय घ्यावा.
२. काही जिल्ह्यांमध्ये गृहरक्षक दलाचे बंदोबस्त मानधन अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. ते देण्याच्या दृष्टीने वित्त विभागाकडून प्राप्त निधी बीडीएसवर प्राप्त झाल्यावर पाच दिवसात ते मानधन होमगार्ड्सना देण्याबाबत परिपत्रक काढावे.
३. होमगार्ड्सना विमा योजनेचा कशाप्रकारे लाभ देता येईल यासंदर्भात विमा कंपनीशी तांत्रिक बाबींवर चर्चा करावी. अपर पोलिस अधिक्षक यांनी होमगार्ड समस्यांबाबत प्रत्येक महिन्यात किमान एक बैठक घेऊन होमगार्डंसच्या समस्यांचा आढावा घ्यावा.
४. सद्यस्थितीत राज्यात कोविड-19 परिस्थितीमुळे वय वर्षे 50 ते 58 वर्षे वयाच्या होमगार्डस्ना कोविड-19 चा धोका पहाता बंदोबस्तकामी बोलाविण्यात आलेले नाही. तथापि 50 ते 58 वर्षांवरील होमगार्ड सदस्यांना कोविड संसर्ग कमी असलेल्या भागात (विशेषत: Level 1) त्यांची सुरक्षा विचारात घेऊन बंदोबस्त देण्याबाबत विचार करण्यात यावा.
या बैठकीस प्रधान सचिव (विशेष) संजय सक्सेना, गृहरक्षक दलाचे उपमहासमादेशक प्रशांत बुरडे, सामाजिक कार्यकर्ते बसवराज पाटील, बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामलिंग पुराणे, होमगार्ड विकास समितीच्या अध्यक्ष श्रीमती आर.डी. लाखन आदि मान्यवर दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते