काल सांगली दौऱ्यावर असतांना अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहिलो. यावेळी, सांगलीतील झुलेलाल चौकात ब्रँड सांगली या उपक्रमाच्यावतीने लावण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग या नामफलकाचे उद्घाटन केले. त्यानंतर मिरज महानगरपालिकेत डॉ. एल. आर. भोसले यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण आणि उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यात सहभागी झालो. तसेच मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात आयोजित केलेल्या त्यांच्या ९६व्या जयंती समारोह सोहळ्यास उपस्थित राहून संवाद साधला.
त्यानंतर सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व माझे स्नेही मा. पृथ्वीराज पाटील यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या २५ लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी बिसुर ग्रामस्थांच्यावतीने सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांचा सत्कार केला. याच गावातील मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला माझे वडील मा. डॉ. डी. वाय पाटील साहेब उपस्थित राहिले होते. सांगली शहराने आणि तेथील नेतृत्वाने हा विकासाचा रथ पुढे तसाच चालू ठेवला आहे हे पाहून मनोमन अभिमान वाटला.
यासह सांगलीत शिवराज्याभिषेक दिनी स्थापन करण्यात आलेल्या, देशातील पहिल्या अखंड शिवज्योतीच्या ठिकाणी भेट दिली. मा. पृथ्वीराज पाटील यांच्या पुढाकाराने शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ही अखंड तेवत राहणारी शिवज्योत स्थापन करण्यात आली. या दिमाखदार सोहळ्याचे नियोजन त्यांनी अत्यंत चोखपणे पार पाडलं. छत्रपती शिवरायांच्या कार्याची प्रेरणा या ज्योतीतून सांगलीकरांनाच नव्हे तर अखंड देशाला मिळत राहणार आहे.