आज सडक सुरक्षा जीवन रक्षा 32 व्या राष्ट्रीय सुरक्षा अभियानाचे उद्घाटन कोल्हापुरात करण्यात आले. यावेळी, रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती माहिती पुस्तिका आणि स्टिकर्स प्रकाशन व प्रबोधन फलक गॅलरीचे उदघाटन करण्यात आले.
रस्ता सुरक्षा सप्ताहावरुन पंधरवडा आणि आता महिनाभर अभियान राबविण्यात येत आहे. मागील वर्षी देशात साडेचार लाख अपघात झाले असून त्यामध्ये तब्बल दिड लाख मृत्यू झाले आहेत. म्हणजे दिवसाला 414 लोकांचा मृत्यू देशात होत आहेत.
रस्ते अपघात कमी होण्यासाठी आणि मृत्यू रोखण्यासाठी सर्वांनी मिळून प्रबोधन करणे गरजेचे आहे तसेच महिनाभर अभियान राबविण्यापेक्षा रस्ता सुरक्षा जीवन रक्षा अभियान वर्षभर राबवून आणि स्वयंशिस्त लावण्याकडे लक्ष दिले पाहिजे.
राज्यातील तपासणी व प्रमाणपत्र केंद्राच्या कामास रु. 136 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी मोरेवाडी येथील केंद्रासाठी 13 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. येत्या साधारण महिनाभरात मोरेवाडी येथील तपासणी व प्रमाणपत्र केंद्राच्या कामास सुरुवात होईल. कोल्हापूर जिल्ह्यातील झालेल्या अपघातांबाबत विश्लेषणात्मक अहवाल तयार करण्याच्या सूचना यावेळी दिल्या असून झालेल्या अपघातांची कारणे काय आहेत, सीट बेल्ट न वापरणारे किती अपघात, अपघातात विद्यार्थ्यांची संख्या किती याबाबत सविस्तर अहवाल प्रादेशिक परिवहन विभागातर्फे राज्याला सादर करून पुढील उपाययोजना करण्यात येणार आहेत.
यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, विभाग नियंत्रक रोहन पलंगे, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस, रॉरी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, मोटार वाहन निरीक्षक युनुस सय्यद, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर आदी उपस्थित होते.