लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वाचा शुभारंभ

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वाचा शुभारंभ

राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचा अनमोल ठेवा भावी पिढीसाठी प्रेरणादायी
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वाचा शुभारंभ आज ऐतिहासिक भवानी मंडप येथे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिमाखात संपन्न झाला.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची ६ मे रोजी १०० वी पुण्यतिथी असून त्यानिमित्ताने हे वर्ष ‘कृतज्ञता पर्व’ म्हणून साजरे करण्यात येत आहे. या निमित्तने १८ एप्रिल ते २२ मे २०२२ कालावधीत विविध कार्यक्रम व उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शाहू महाराजांची उद्योगाला चालना देण्यासाठी त्यांच्या दूरदृष्टीने सुरु केलेल्या शाहू मिलमध्ये कृतज्ञता पर्वाचे कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा जागर केला जाणार आहे. शाहू महाराजांचे कार्य सामान्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
कृतज्ञता पर्वाचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती ताराराणी यांच्या रथोत्सवाचे औचित्य साधून होत आहे ही बाब आनंदाची आहे. या कृतज्ञता पर्वात सहभागी होण्यासाठी मी सर्वांना निमंत्रित करत असून जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांने या कृतज्ञता पर्वात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी केले.
राजर्षी शाहू महाराज हे समतेचा संदेश देणारे आणि पुरोगामी विचारांचा जागर करणारे लोकराजे होते. राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दी कृतज्ञता पर्वात लोकराजा शाहू महाराजांच्या कार्याला उजाळा देण्यात येणार आहे.
शाहू महाराजांचे विचार हे अनमोल ठेवा असून त्यांचे कार्य आणि विचार भावी पिढीला आजही मार्गदर्शक व प्ररेणादायी आहे. कृतज्ञता पर्वाच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांचे कार्य, विचार, दृष्टिकोनाचा परिचय करुन देण्याबरोबरच समतेचा संदेश देणाऱ्या शाहू विचारांचा हा ठेवा सामान्यांपर्यंत पोहचविण्याचा आमचा मानस आहे.
कोल्हापूर जिल्ह्याला वेगळा इतिहास असून राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या दूरदृष्टिने कृषि व्यापार, उद्योग घटकांच्या वाढीसाठी अनेक उपक्रम, योजना राबवून या भागाचा विकास केला आहे. त्यांच्या संकल्पनेतील विकास घडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया, हीच कृतज्ञता पर्वात राजर्षी शाहू महाराजांना आदरांजली ठरेल.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व शुभारंभ कार्यक्रमात कृतज्ञता पर्व कार्यक्रमाची रुपरेषा असलेल्या कॅलेंडरचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू पी. एस.पाटील, यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व शाहू प्रेमी उपस्थित होते.