लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व सांगता

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व सांगता

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्त कोल्हापूर जिल्हा प्रशासनातर्फे दि.18 एप्रिल ते 22 मे 2022 दरम्यान आयोजित ‘कृतज्ञता पर्व’ची सांगता आज करण्यात आली.

शाहू महाराजांचे कार्य भावी पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘कृतज्ञता पर्व’ उपक्रम घेण्यात आला. हजारो हात एकत्र आल्यामुळेच हा उपक्रम यशस्वी झाला. कोल्हापूरकरांनी याला चांगली साथ दिली, म्हणूनच हा उपक्रम जगभर पोहोचला.
लोकांसाठी.. लोकाभिमुख कारभार असावा, हेच शाहू महाराजांचे विचार होते. याच विचारांनी कार्यरत असून शाहू महाराज समाधी स्थळाच्या पुढच्या विकासासाठी आठ कोटींचा निधी सामाजिक न्याय विभागाकडून दिला जाणार आहे, त्यामुळे आता स्मारकाचे काम गतीने होईल.

केवळ जिल्ह्यापुरता मर्यादित असणारा १०० सेकंद स्तब्ध उभे राहण्याचा उपक्रम सर्वांमुळे जगभर पोहोचला. शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित व्याख्याने एकाच वेळी ३५० ठिकाणी घेण्यात आली. याद्वारे राजर्षी शाहू महाराजांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचले.
शाहू महाराजांचे विचार जोपासणं..वाढवणं हे या सर्व उपक्रमाचे उद्दिष्ट होते. शाहू मिलच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहून शाहू मिल विकास आराखडा मंजुरीसाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली जाणार आहे.

हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही बाब वाखाणण्याजोगी आहे. शाहूराजांचा विचार समाजात घट्ट रुजले आहेत याचीच ही प्रचित आहे. शाहू राजांचे कार्य आणि कर्तृत्व मोठे असून त्यांचा ठेवा जोपासण्याचे काम यापुढेही अशा माध्यमांतून केले जाईल.

कृतज्ञता पर्व अंतर्गत वर्षभर यापद्धतीने कार्यक्रम होणार असून शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच शाहूंच्या विचारांचा वारसा जोपासण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील. राज्यभरात असे उपक्रम आयोजित करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.

कृतज्ञता पर्व अंतर्गत ‘100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला मानवंदना’ या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर नोंद करण्यात आली आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कार्यरत ‘कृतज्ञता पर्व संयोजन समिती’ सदस्य, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत तसेच सर्व उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात योगदान देणारे सर्व मान्यवर, संस्था, संघटना, उद्योजक, विविध विभागांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच, ‘विधवा प्रथा बंदी’ चा निर्णय घेतल्याबद्दल हेरवाड व माणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य व ग्राम विकास अधिकारी तसेच याविषयी सामाजिक प्रबोधन करणाऱ्या शुभांगी थोरात यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विविध योजनेतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच तृतीयपंथीयांना मान्यवरांच्या हस्ते ओळखपत्राचे वाटप करण्यात आले.

यावेळी, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. मनोज लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, शाहूप्रेमी उपस्थित होते.