म्हाडाच्या सिद्धार्थ नगर गोरेगाव पुनर्विकास प्रकल्पातील प्रलंबित सदनिका बांधकामाचा शुभारंभ

म्हाडाच्या सिद्धार्थ नगर गोरेगाव पुनर्विकास प्रकल्पातील प्रलंबित सदनिका बांधकामाचा शुभारंभ

म्हाडाच्या सिद्धार्थ नगर ( पत्राचाळ ) गोरेगाव पुनर्विकास प्रकल्पातील प्रलंबित सदनिकांच्या बांधकामाचा शुभारंभ आज माननीय मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे यांच्या शुभहस्ते आणि महाविकास आघाडीचे नेते, आमचे मार्गदर्शक माननीय खासदार शरद पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
माननीय मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार शहरीकरणाच्या वाढत्या रेट्यात मुंबई सारख्या शहरात राहणाऱ्या नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित निवारा देण्यासाठी कटिबद्ध असून मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील म्हाडाच्या जमिनीवरील सिद्धार्थ नगर सहकारी गृहनिर्माण संस्था (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्पातील ६७२ मूळ गाळेधारकांच्या १४ वर्षांपासून रखडलेल्या प्रलंबित सदनिकांच्या बांधकामाचा शुभारंभ आज झाला, ही निश्चितपणे आनंददायी बाब आहे.

या प्रकल्पात ६७२ मूळ गाळेधारकांना पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून ६५० चौरस फूटाची पुनर्विकसित घरे मिळणार आहेत. यामुळे या सर्व सभासदांचे जीवनमान उंचावणार आहे. सदनिका मिळालेल्या सर्वांचे मी मनःपूर्वक

अभिनंदन करतो.
कोरोना काळात स्वतःचे हक्काचे घर असावे ही गरज ठळकपणे अधोरेखित झाली. त्यामुळे प्रचंड वेगाने वाढत्या महानगरांत अन्न, वस्त्र व निवारा या मुलभूत गरजांपैकी निवाऱ्याची गरज भागवताना सर्वसामान्य नागरिकांना हक्काचं आणि परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडा आणि महाविकास आघाडी सरकार काम करत आहे.
म्हाडाच्या मार्फत राज्यातील नागरिकांसाठी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून सुमारे २७१८८ परवडणाऱ्या सदनिका उपलब्ध करून दिल्या आहेत.
म्हाडाने कोविडच्या काळामध्ये समर्पित आरोग्य केंद्राची निर्मिती केली असून कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांसाठी बॉम्बे डाईंग इमारतीमध्ये १०० संक्रमण गाळे उपलब्ध करून दिले आहेत. मुंबईत शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्मिती तसेच रायगड जिल्ह्यातील तळई गावाच्या पुनर्वसनाची जबाबदारी यासाठी म्हाडाने कायम पुढाकार घेतलेला आहे.
हा कार्यक्रम मा.उपमुख्यमंत्री अजित पवार जी, मा.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात जी, उद्योगमंत्री सुभाष देसाई जी,गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड जी, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख जी, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे जी,महापौर किशोरी पेडणेकर जी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. महाविकास आघाडीच्या नेत्या आदरणीय सोनिया जी गांधी, आमचे मार्गदर्शक शरद पवार साहेब आणि माननीय मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्याचा सर्वसमावेशक विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत.