दरवर्षीप्रमाणे आज मौनी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त पाटगाव येथे ‘ज्ञानज्योत’ प्रज्वलित करण्यात आली. ही ज्योत म्हणजे मौनी महाराजांनी केलेल्या अध्यात्मिक ज्ञानाच्या प्रचाराचे प्रतीक. पाटगाव येथे ही ज्योत प्रज्वलित करून ती मौनी विद्यापीठामध्ये वर्षभर तेवत ठेवली जाते. समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत ज्ञानाची ही ज्योत पोहोचवण्यासाठीचा उर्जा स्रोत म्हणजे ही ‘ज्ञानज्योत’.
मुळचे उत्तूरचे असलेले मौनी महाराज कालांतराने पाटगावला स्थायिक झाले. पूर्वी तळकोकणात जाण्यासाठीचा मार्ग हा पाटगाव मार्गे जात असे. त्यावेळी व्यापारांच्या ताफ्यातून मौनी महाराज हे पाटगावला आले आणि इथेच स्थायिक झाले. पाटगावला आल्यानंतर महाराजांनी मौन धरण केले होते, ह्याच मुळे त्यांना ‘मौनी महाराज’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
स्थायिक झाल्यानंतर पाटगाव आणि आसपासच्या परिसरामध्ये मौनी महाराजांचे अध्यात्मिक कार्य सुरु होते. असे सांगितले जाते की, छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयासाठी जात असताना मौनी महाराजाना भेटण्यासाठी आले होते. मौनी महाराजांचे दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले. त्यानंतर शिवाजी महाराजांना दक्षिणेतून परतायला वर्ष गेले. दक्षिणेत विजय संपादित करून महाराज रायगडला परतत असतांना छत्रपती शिवाजी महाराज मौनी महाराजाना भेटण्यासाठी गेले असताना त्यांना कळले की. मौनी महाराजांनी आपले जीवनकार्य संपवले होते. त्यांनी जिवंत समाधी घेतली होती. म्हणून शिवाजी महाराजानी पाटगाव येथे त्यांचा समाधीवर मंदिर बांधले. त्यानंतर छत्रपत्री संभाजी महाराज आणि कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज यांनी देखील पाटगावला जाऊन मौनी महाराजांचे दर्शन घेतल्याचा उल्लेख आढळतो.
यंदा सलग २२ व्या वर्षी ज्ञानज्योत प्रज्वलित करण्याच्या कार्यक्रमास उपस्थित राहता आले. आज त्यांच्याच नावाने सुरु असलेल्या मौनी विद्यापीठामार्फत मला तसेच डॉ. डी. वाय. पाटील परिवाराला गारगोटी तसेच आसपासच्या परिसरातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी हातभार लावण्याची संधी मिळत आहे, हे आम्ही आमचं भाग्य समजतो.