माणुसकी अजूनही जिवंत आहे – शिवाजी पुलावर घडलेल्या दुर्दैवी अपघाताने करून दिली जाणीव…

माणुसकी अजूनही जिवंत आहे – शिवाजी पुलावर घडलेल्या दुर्दैवी अपघाताने करून दिली जाणीव…

माणुसकी अजूनही जिवंत आहे…

काल रात्री कोल्हापूरातील ऐतिहासिक शिवाजी    पुलावर अतिशय हृदयविदारक अपघात घडला, पुलाचा कठडा तोडून गाडी पंचगंगा नदीपात्रात कोसळली आणि गाडीच्या चालकासह पुण्यातल्या बाणेवाडी भागात राहणाऱ्या केदारी कुटुंबातील १३ निष्पाप जीवांचा प्राण या दुर्घटनेत गेला. मृतांमध्ये एक ९ महिन्याच्या बालिकेचा देखील समावेश आहे.

या दुर्घटने बाबत मला काल रात्री उशिरा कळाले आणि समजताच घटनास्थळी गेल्यावर पाहिले कि अनेक कार्यकर्ते, व्हाईट आर्मी चे जवान, नगरसेवक आणि नागरिक, सर्वच तिथे बचाव कार्यात मदत करत आहेत.

रात्री १२ च्या सुमारास हि घटना घडली आणि गाडी धडकण्याच्या प्रचंड आवाजाने, जुना बुधवार पेठ आणि तोरस्कर चौक या परिसरातील कार्यकर्ते सर्वात पहिले मदतीला धावले आणि परीट घाटापासून वाट काढत, ही मुलं त्या बस जवळ पोहोचली. ६-७ लोकांना बाहेर काढून, त्यातल्या तिघांचा प्राण त्या तरुण मित्रांनी वाचवला.

संपूर्ण रात्र हि बस काढण्यामध्ये प्रशासन आणि कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने प्रयत्न करत होते. ही बस कुठली आहे, त्यामधले लोक कोण आहेत, कुठल्या गावाचे आहेत, कुठल्या समाजाचे आहेत ह्याचा विचार न करता, अडचणीत आलाय त्याला मदत केली पाहिजे, या भावनेतून कोल्हापूरवासियांनी शाहू महाराजांचा वारसा खऱ्या अर्थाने जपला. तब्बल ४:००-४:३० तास हे अखंड प्रयत्न चालू होते आणि या प्रयत्नात क्रेन आणण्यापासून ते क्रेन लावण्यापर्यंत, ती गाडी पाण्या-बाहेर काढण्यापर्यंत, सर्वांनी जे सामुदायिक प्रयत्न केले, त्याची तुलना मी कशाचीच करू शकत नाही. हजारो हात ज्यावेळी मदतीला पुढं येतात त्यावेळी अतिशय वाईट प्रसंगाला माणूस कश्याप्रकारे तोंड देऊ शकतो हे कालच्या कृतीतून लक्षात येते.

पहाटे पाच वाजता सर्व मयतांना सी. पी. आर. हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. त्या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल किंवा आमचे सर्व नगरसेवक असतील, या सर्वांनी जी सर्व प्रक्रिया, किंबहुना पोस्टमार्टम असेल, नातेवाईकांना कळवणं असेल, नातेवाईकांना पुण्यातून बोलवने असेल, या सगळ्या प्रक्रियेमध्ये हि सर्व तरुण मंडळी सहभागी झालीत आणि तब्बल १२ तासानंतर हा दुर्दैवी प्रकार क्रमशः आला आणि ११ अँब्युलन्स मधून मयत आणि जखमींना पुण्यास पाठविण्यात आले.

ज्या ९ महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला, ते बाळ बऱ्याच वर्षानंतर, त्या दाम्पत्याला झाले होते आणि त्यामुळे सर्व कुटुंबीयांसहित ते देवदर्शनास आले होते. अश्या परिस्थिती मध्ये, ज्यावेळी पुण्याहून शोकाकुल कुटुंबीय कोल्हापुरात दाखल झालीत, त्यावेळी त्यांच्या मनातला आक्रोश आणि संपूर्ण कुटुंबच्या-कुटुंब गेल्याचे दु:ख पाहिल्यानंतर, देव कुठं तरी आहे का नाही हा यक्षप्रश्न माझ्या मनात उभा राहिला.

या काळामध्ये माणसातली माणुसकी संपल्याची चर्चा आपण करतो, त्यावेळी हजारो हात एकत्र आले आणि माणुसकी जपली गेली, परंतु देवानं का डोळे झाकले आणि हि घटना का घडू दिली हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आहे.

या दुर्दैवी प्रसंगातून जात असताना आणि अशी काळरात्र कोणाच्याच आयुष्यामध्ये येऊ नये ही प्रार्थना करतांना, ती प्रार्थना नेमकं कुणाकडे करावी, कारण कि ऐकणार्याने हे का घडू दिले हि एक शंका माझ्यासारख्याच्या मनामध्ये निर्माण होते. म्हणूनच कदाचित, हि सगळी घालमेल सकाळी ११-१२ वाजता जरी संपली असेल, तरी देखील मन अजून उद्विक्त आहे. हे घडलंच कसं? का घडलं? हे घडलं नसतं तर त्या सर्वच निष्पाप लोकांचे जीव वाचले असते, आयुष्याचे जे काही रंग आहेत ते त्या लोकांनी पहिले असते असाही एक विचार मनामध्ये निर्माण होतो.

असे दुर्दैवी प्रसंग घडू नयेत यासाठी योग्य ती दक्षता सर्वांनीच घेतली पाहिजे आणि जे कुटुंब यामधून गेले आहे, अश्या कुटुंबातील लोकांना आधार देण्याची भूमिका समाजानं घ्यायला हवी. कोल्हापूर वासियांनी व असंख्य तरुणांनी, एक आपलं कुटुंब, आपल्या घरातील कोण तरी पडलंय, या भावनेतून जे मदतीचे हात पुढे केले, त्या भावनेला माझा सलाम…!

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email