मराठा क्रांती मूक आंदोलनात सहभाग

मराठा क्रांती मूक आंदोलनात सहभाग

आज कोल्हापुरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळ येथे युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या मराठा क्रांती मूक आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दिला.
मराठा आरक्षण प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी हातात हात घालून, संयमाने प्रयत्न करूया असे आवाहन यावेळी केले. संभाजीराजे छत्रपती यांनी मांडलेल्या राज्य सरकारच्या अखत्यारीतील मराठा समाजाच्या सर्व मागण्या राज्य सरकार पूर्ण करेल. महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणाच्या विषयात पाठपुरावा करण्यामध्ये आजपर्यंत कुठेही कमी पडलेले नाही आणि भविष्यातही कमी पडणार नाही, अशी ग्वाही दिली.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत संभाजीराजे छत्रपती यांच्याशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह सर्व मंत्री तयार आहेत. संभाजीराजे यांनी चर्चेसाठी आपला वेळ द्यावा. मुंबईत मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांबरोबर चर्चेसाठी येण्याचे निमंत्रणही पालकमंत्री म्हणून यावेळी राज्य शासनाच्यावतीने त्यांना दिले.
महाराष्ट्राने आज पुन्हा एकदा एकजूट दाखविण्याची नितांत आवश्यकता आहे. केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींना महाराष्ट्रातील मराठा समाजाची बाजू पटवून सांगण्यासाठी पक्षीय दृष्टीकोनापलिकडे पाऊल टाकले पाहिजे, असे मत यावेळी मांडले.
मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घेऊन संपूर्ण मराठा समाजात जनजागृती केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अत्यंत संयमाने आणि शिस्तबद्धपणे हे मूक आंदोलन करण्याची भूमिका घेतली, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. या आंदोलनावेळी कोल्हापूर पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे योग्य नियोजन केल्याबद्दल पोलीस प्रशासनसुद्धा

अभिनंदनास पात्र आहे.
मराठा समाजाच्या पाठीशी नेहमीच भक्कपणे राहिलेल्या श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी सर्वांना मौलिक मार्गदर्शन करताना सांगितले की, मराठा आरक्षणाच्या बाबत सर्वांनी एकमुखाने पुढे जायला हवे. सर्वांनी एकत्र येऊन मराठा समाजाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवून आरक्षणासाठी पाठपुरावा करावा. मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत महाराष्ट्र शासन आपल्या बरोबर राहणार आहेच. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी लवकरात लवकर ठोस पावले उचलून महाराष्ट्र शासन पुढे जाईल, असा मला विश्वास वाटतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र शासनाने हा विषय मनावर घेतला, त्यांनी ठरवलं तर हा प्रश्न सुटू शकतो. संसदेत जास्तीत जास्त खासदारांनी त्याला पाठबळ दिल्यास हा प्रश्न मार्गी लागेल. त्यासाठी संसदेमध्ये बहुमत असणाऱ्या पंतप्रधानांकडे पाठपुरावा करून महाराष्ट्रातील सर्व खासदार, आमदार आणि राज्य शासनाने मराठा आरक्षणाचे महत्त्व पटवून द्यावे, असे आवाहन ही श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी केले.
यावेळी, मा. प्रकाश आंबडेकर जी, ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ साहेब, राज्यमंत्री ना. राजेंद्र पाटील यड्रावकर, खा. संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने, संयोगिताराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार, मराठा समाजाचे राज्यातील समन्वयक उपस्थित होते.