मंत्रालयातील ई-ऑफिस प्रणालीबाबत सादरीकरण तसेच आढावा बैठक

मंत्रालयातील ई-ऑफिस प्रणालीबाबत सादरीकरण तसेच आढावा बैठक

मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या शासकीय निवासस्थानी मंत्रालयातील ई-ऑफिस प्रणालीबाबत सादरीकरण तसेच आढावा बैठक घेण्यात आली.

प्रशासकीय व्यवस्था गतिमान करतानाच जनतेलाही चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी ई-ऑफिस प्रणाली आणखी सक्षम करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. त्यानुसार, मंत्रालयातील ई-फाईल, ई-लीव्ह, केएमएस, एमआयएस या प्रणाली लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

यावेळी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील क्लाऊड टेक्नॉलॉजी सारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून निर्णय प्रक्रीयेतील प्रत्येक घटकाला अधिकारी-कर्मचारी आणि सचिव ते मंत्री यांना कुठूनही काम करता येईल, अशी प्रणाली तयार करण्याच्या सूचना मा. मुख्यमंत्री यांनी केल्या.

मंत्रालयीन प्रशासकीय गतिमानतेबरोबरच नागरिकांना सुविधा देण्यासाठी तक्रार निवारण आणि स्थानिक समस्यांबाबत सोशल मिडीया टिकेटींग सारखी प्रणाली, चॅट-बॉट सारख्या गोष्टी वापरण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

सुरवातीला काही विभागांना पूर्णपणे ई-ऑफिस प्रणाली वापरण्यासाठी सक्षम करण्यात येईल.त्यासाठी त्यांना आवश्यक सुविधा पुरविण्यात येणार आहेत.तसेच प्रशासकीय सुधारणेचा भाग म्हणून कार्यालयीन कामकाजाच्या हस्तपुस्तिका तसेच विविध प्रकारची परिपत्रके ही यापुढे डिजीटल पद्धतीने काढण्यात येणार आहे.

या बैठकीस पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक रणजित कुमार, मुख्य सचिव कार्यालयाचे उपसचिव उदय चौधरी आदी उपस्थित होते.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email