ब्रँड कोल्हापूर मोठा करुया.
कोल्हापूर हा अगदी इतिहास काळापासून ब्रँड आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांपासून, शिक्षणाच्या धोरणापासून ते केशवराव भोसले, खाशाबा जाधव, लता मंगेशकर अशा नामवंतांनी आणि त्यांच्या कामाने कोल्हापूरला कायमच सगळ्यांपेक्षा एक पाऊल पुढेच ठेवले आहे. अवधूत गुप्ते जेव्हा जिथे जिथे जे जे भरपूर ते माझे कोल्हापूर ,अस म्हणतो तेव्हा त्या पाठीमागे या साऱ्या इतिहासाचा वारसा असतो.
आपली आजची पिढी सुद्धा तितकीच तोडीस तोड आहे. जगात विविध ठिकाणी आणि विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करून आपले आणि रूढार्थाने कोल्हापूरचे नाव मोठे करत आहे. अशा यशोशिलेदारांचे विविध संस्था या ना त्या निमित्ताने छोट्या मोठ्या प्रमाणात कौतुक सुद्धा करत असतात. पण हे यशोशिलेदार जेव्हा एखादी गोष्ट अचिव्ह करतात, तेव्हा ते प्रत्यक्षात गावाच नाव मोठं करत असतात. शेवटी एखाद्या गावाची आयडेंटिटी बनते ते कशामुळे? तर तिथल्या माणसांमुळेच!! त्यामुळे, या सर्वांचा आपल्या गावाच्या नावाने सन्मान केला पाहिजे असा विचार आला आणि त्यातून २०१८ साली
#BrandKolhapur हा उपक्रम सुरू झाला.
यावर्षीच्या ब्रँड कोल्हापूर कार्यक्रमामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कला, क्रीडा, विज्ञान, उद्योग, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर यश संपादन करून मागील एक वर्षात कोल्हापूरचे नाव उज्ज्वल केलेल्या ९८ मान्यवरांचा सत्कार महाराष्ट्र राज्य नगर विकास विभागाचे मुख्य सचिव व कोल्हापूरचे सुपुत्र मा. श्री. भूषण गगराणी यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
या सत्काराच्या माध्यमातून ज्यांनी आपल्या कष्टातून कोल्हापूरचा लौकिक वाढविला, अशांप्रती कृतज्ञता, जे वैशिष्ट्यपूर्ण काम करत आहेत, त्यांना प्रोत्साहन, व ज्यांचे काम फारसे लोकांपुढे आलेले नाही, पण जे उत्तम काम करत आहेत अशा नवेदितांना प्रोत्साहन व सुसंधी मिळावी, अशी भूमिका आहे.
आजच्या या कार्यक्रमामध्ये ज्यांना ब्रँड कोल्हापूर हा पुरस्कार मिळाला त्यासर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.