प्रजासत्ताक दिन

प्रजासत्ताक दिन

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूरात ध्वजारोहण केले. या मंगलदिनी थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या, क्रांतीकारकांच्या आणि देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले अशा सर्व विचारवंतांच्या प्रती आदर व्यक्त करून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होत आहेत. यानिमित्ताने यावर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. स्वातंत्र्य लढ्यामध्ये हजारो स्वातंत्र्यसेनानींनी खडतर परिश्रम केले, कित्येकांनी आपल्या प्राणाची आहुती सुद्धा दिली.

कोल्हापुरातील बिंदू चौक,गारगोटी ही ठिकाणे या स्वातंत्र्य चळवळीच्या ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहेत. जिल्ह्यातील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार, भाई माधवराव बागल, करवीरय्या सिध्दय्या स्वामी, शंकरराव कृष्णाजी इंगळे, नारायण दाजी वारके, शंकरराव माने यांच्यासह कित्येक स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिले.
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यसेनानींच्या त्यागापासून स्फूर्ती आणि प्रेरणा घ्यायला हवी. देशासाठी आपलं रक्त सांडणाऱ्या क्रांतिकारकांचं कार्य सदैव स्मरणात ठेवून आपण राज्याचं आणि देशाचं नाव आणखी उंचावण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहूया..!

मागील तीन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनाच्या महामारीला सामोरं जात आहे. आपल्या जिल्ह्यात, राज्यात व देशातही सद्यस्थितीमध्ये ओमायक्रॉन या विषाणूचा प्रसार होत आहे. आरोग्य यंत्रणेने सांगितल्यानुसार देशात कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी स्वतःचे व स्वतःच्या कुटुंबाचे कोरोना पासून संरक्षण करण्यासाठी शासन आणि प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे.

कोल्हापुरातील सर्व नागरिक,सेवाभावी संस्था, प्रशासन विशेषतः आरोग्य विभाग, पोलीस आणि सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या सर्वांचे विशेष आभार व्यक्त करतो. कोरोनावर मात करण्यासाठी आपण सर्वानीच अहोरात्र प्रयत्न करून जिल्ह्याला सुरक्षित ठेऊन ‘आम्ही कोल्हापूरी-जगात भारी’ ही उक्ती सार्थ ठरवली आहे.
विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा आपला कोल्हापूर जिल्हा उद्योग, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, वैद्यकीय, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रात चांगली प्रगती करीत आहे. ही आनंदाची बाब असून जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मी या प्रसंगी देतो.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने साकारलेल्या या राज्यात सर्वसामान्य माणूस, शेतकरी, कष्टकरी, कामगार सुखी व्हावे आणि तळागाळातील शेवटचा घटकही विकासाच्या मुख्य प्रवाहात यावा यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द आहे.
देशाची, राज्याची तसेच आपल्या जिल्ह्याची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी जागरुक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्रित येऊन काम करु या ! पुनश्च: एकदा आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
!!जय हिंद | जय महाराष्ट्र !!

 

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email