आज दै. पुढारी मार्फत आयोजित ‘एज्युदिशा २०२२’ या शैक्षणिक प्रदर्शन व ज्ञानसत्राचे उदघाटन करण्यात आले. तीन दिवस चालणाऱ्या या सत्रात कोल्हापुरातील विद्यार्थी व पालकांना विविध तज्ज्ञांचे मोलाचे मार्गदर्शन होणार आहे.
दहावी व बारावी ही करिअरच्या दृष्टीने महत्वाची वर्षे आहेत. पण फक्त नेहमीच्याच अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी इतर नवनवीन उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक संधींचा सुद्धा विचार करायला हवा. कोव्हीडच्या काळात कोणते क्षेत्र मुळापासून बदलले असेल तर ते शिक्षण. दोन वर्षांपूर्वी जेव्हा प्रत्यक्षात इथे एज्युदिशा झालं असेल तेव्हाच शिक्षण आणि आता २ वर्षांने पुन्हा श्री गणेशा करतानाचे शिक्षण यात जमीन अस्मानाचा फरक झालेला आहे. आणि तो फरक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी समजून घेण्याची गरज आहे.
सगळ्याच गोष्टी ऑनलाईन शिकता येतात असेही नाही, ऑनलाईन शिकताना माहिती नक्की मिळू शकते. पण त्याचे अनॅलिसिस, सिंथेसिस कसे करायचे, समाजात कसे वागायचे (इंटर पर्सनल स्किल्स) या गोष्टी प्रत्यक्षातच शिकायला लागतात. गेल्या २ वर्षात सर्वच विद्यार्थ्यांच्यात याबद्दलचा एक गॅप तयार झाला आहे. त्यावर काम कसे करायचे याबद्दल सुद्धा या तीन दिवशीय संमेलनातून कोल्हापूरकराना मार्गदर्शन होईल अशी खात्री आहे.
आताचे जग फार वेगळे आहे. आताच्या तरुणाला पुढच्या ४० वर्षात ७ वेळा करिअर बदलावे लागेल असे वेगवेगळे अभ्यास सांगतात. अशावेळी या सगळ्या बदलत्या करिअरचा पाया हा तुम्ही आता घेत असणारे शिक्षण हाच राहणार आहे. त्यामुळे आता नीट निवड केल्यास पुढचे आयुष्य चांगले जाऊ शकते.
पुढचे काही वर्षे कठीण असणार आहेत. अशावेळी सुशिक्षित आणि सुजाण तरुण हा गरजेचा आहे. पण, आता प्रश्न असा आहे की एका बाजूला लोकांना जॉब नाही आहे आणि दुसऱ्या बाजूला उद्योजक म्हणतात की चांगली माणसे मिळत नाहीत. ही कोंडी फोडायची जबाबदारी शिक्षण क्षेत्राची आहे आणि त्यातील सर्व घटकांनी ती पार पाडली पाहिजे.
