डिजीटल गार्डियन कार्यशाळा संबधी पत्रकार परिषद

डिजीटल गार्डियन कार्यशाळा संबधी पत्रकार परिषद

सद्याच्या ऑनलाईन युगात मोबाईलच्या माध्यमातून इंटरनेटचे जग हातात आले आहे. इंटरनेटमुळे ज्ञान व माहितीचा खजिना चुटकीसरशी उपलब्ध होत आहे. पण त्याबरोबर ऑनलाईन धोक्यांची व्याप्ती वाढत आहे. याबद्दल पालक, शिक्षक व विद्यार्थीसुध्दा अनभिन्न आहेत. म्हणूनच याबाबत प्रबोधन करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक तीन हजार शाळांमध्ये नवीन वर्षात ‘चाईल्ड ऑनलाईन प्रोटेक्शन’ अभियान राबविण्यात येणार आहे.

सतेज पाटील फौंडेशन, अहान फौंडेशन मुंबई, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ व इतर शिक्षक संघटना यांच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याचा भाग म्हणून पहिल्या टप्प्यात दि.८ जानेवारी रोजी कोल्हापूर जिल्ह्यामधील ३०० माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक व तंत्रस्नेही शिक्षक यांच्यासाठी शाहू स्मारक भवन येथे सकाळी १० ते ३ या वेळेत प्रशिक्षण कार्यशाळा होणार आहे.

इंटरनेटच्या आभासी जगाला भौगोलिक, आर्थिक, सामाजिक असे कोणत्याही प्रकारचे कुंपण अडवू शकत नाही हे आपण सारेच अनुभवतो आहोत. मात्र मुलांचे पालक, घरातील प्रौढ व्यक्ती यांनाच ‘ऑनलाईन’ धोक्यांची व्याप्ती आणि तीव्रता याची जाणीव नसल्याने लहान मुले सहजपणे या ऑनलाईन धोक्यांना बळी पडतात असे आढळून आले आहे.

मागील सहा वर्षे सायबर सुरक्षा या विषयाबाबत काम करताना अहान फौंडेशन ने त्यांच्या संपर्कात आलेल्या सुमारे साडे आठ लाख प्रौढ आणि मुलांच्या अनुभवांवरुन, ऑनलाईनच्या आभासी जगातील सायबर धोक्यांना लहान मुले किती सहजपणे बळी पडतात, याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ऑनलाईन धोक्यांमध्ये धोकादायक खेळ, मानसिक छळवणुक, लैंगिक मजकूर/छायाचित्रे, अश्लिल साहित्याची/चित्रपटांची चटक लागणे, निद्रानाश, नैराश्य अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. दुर्देवाने घरातील प्रौढ व्यक्तींनाच आधुनिक तंत्रज्ञान आणि त्यावर आधारित साधने कशी वापरायची याचीच माहिती नसते. त्यामुळे या तंत्रज्ञानातून निर्माण झालेल्या धोक्यांबाबत, निर्माण होणा­या त्रासांबाबत ते अनभिन्न असतात. त्यामुळेच मुलांना वाढवणाऱ्या , त्यांचे संगोपन करणाऱ्या पालकांना, घरातील प्रौढ व्यक्तींना सर्वात आधी ऑनलाईन धोक्यांची जाणीव करुन देणे आणि त्यापासून बचाव कसा करायचा? हे शिकवणे ही आता काळाची गरज बनली आहे.

या पाश्र्वभूमीवर आपल्या भावी पिढीचे ऑनलाईन संकटांपासून संरक्षण करण्यासाठी एक सक्षम आणि समर्थ अशी डिजिटल संरक्षकांची (डिजीटल गार्डियन ) फळी उभारण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक शाळांतील तंत्रस्नेही शिक्षकांना प्रशिक्षक देण्यात येणार आहे. हे शिक्षक नंतर विद्यार्थी तसेच पालकांचे प्रबोधन करतील. या अभियानात महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांना या माध्यमातून प्रत्यक्ष गावात जाऊन ग्रामस्थानांसुध्दा याबाबत प्रबोधन करण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळांतील तंत्रस्नेही शिक्षकांना टप्याटप्याने याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

याच विषयी आज अजिंक्यतारा कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी सर्व पत्रकार बंधू तसेच भगवान पाटील ( जि.प. सदस्य ) भरत रसाळे, दादा लाड, ( शिक्षक नेते ) जयंत आसगावकर दता पाटील (मुख्याध्यापक संघ सचिव ) बाबा पाटील, राजेश वरक, शिवाजी कोरवी, प्राचार्य ए बी पाटील, विलास पिंगळे प्राचार्य महादेव नरके आदि उपस्थित होते.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email