छत्रपती शाहू महाराज छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

छत्रपती शाहू महाराज छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज #कृतज्ञता_पर्व निमित्त आयोजित छत्रपती शाहू महाराजांचे जीवनकार्य, आदेश, इ. वर आधारित छत्रपती शाहू महाराज छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आज ज्येष्ठ नेते मा. खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते व श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले .
शाहू मिलच्या परिसरात भरलेल्या या आगळ्या – वेगळ्या प्रदर्शनात शाहू महाराजांच्या इ. स.१८९४ – ते १९२२ या २८ वर्षांच्या दैदिप्यमान राज्य कारभाराचा कालखंड या प्रदर्शनातून शाहू प्रेमींसाठी पाहायला मिळणार आहे. या प्रदर्शनात सुमारे 200 हून अधिक दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश आहे.
केवळ २८ वर्षांच्या दैदिप्यमान कारकीर्दीमध्ये समाजकारण-प्रशासन यांच्या सर्वांगीण विकासाचा मजबूत पाया घालून दूरदृष्टीने घेतलेले महत्वपूर्ण निर्णय आणि त्याची अंमलबजावणी यांनी विकासाचे नवे पर्व निर्माण केले.
दि. ६ मे १९२२ रोजी महाराजांचे निधन झाले. यावर्षी या घटनेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. गेल्या शंभर वर्षाचा मागोवा घेतला तर महाराजांनी दूरदृष्टीने निर्माण केलेले कोल्हापूर हे आपल्या देशासाठी सर्वांगीण विकासाचे मापदंड ठरले आणि सामाजिक व आर्थिक परिवर्तन घडविण्यासाठी पथदर्शी ठरले.
या प्रदर्शनामध्ये इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्या संग्रहातील दुर्मिळ छायाचित्रे प्रदर्शित केली असून महाराजांच्या कार्याचा विचारांचा ठसा असलेली महत्वपूर्ण कागदपत्रे, कायदे , आदेश आपणास पाहायला मिळणार आहेत.
हे प्रदर्शन २४ एप्रिल ते २२ मे अखेर शाहू मिल येथे सकाळी ९ ते रात्री ९ चे दरम्यान सुरू रहाणार आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे या संशोधनंपूर्ण प्रदर्शनास आवर्जुन वेळ नक्की भेट द्या.
यावेळी, खा. श्रीनीवास पाटीलजी, आ. अरुण लाड, आ. जयंत आसगावकर, आ.संग्राम थोपटे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, इतिहासकार इंद्रजित सावंत आदी उपस्थित होते.