कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. कोविड-१९ च्या अनुषंगाने सदरची बैठक ऑनलाईन संपन्न झाली.
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन 2022-23 साठी 640.20 कोटींच्या आराखड्याला आज मान्यता देण्यात आली आहे. शासनाने दिलेल्या 440.20 कोटींच्या वित्तीय मर्यादेत 200 कोटींची अतिरिक्त मागणी समितीने शासनाकडे केली आहे. सन 2021-22 साठी 493.21 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतुद करण्यात आली होती.
त्यापैकी 493.21 कोटी शासनाकडून प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 281.41 कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. डिसेंबर अखेर 127.24 कोटी रुपये खर्च झाले आहेत. यावर्षी 72 कोटी रुपये कोरोना प्रतिबंधक सेवा-सुविधा व उपाययोजनांसाठी खर्च झाले आहेत.
जिल्ह्यातील साकव बांधकाम, इतर जिल्हा रस्ते व मजबुतीकरण, ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण, पूर नियंत्रण, महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान, रुग्णालये बांधकाम, पोलीस यंत्रणेस पायाभूत सुविधा पुरविणे व क्रीडा विभागाकडील योजना, आदी योजनांकरिता राज्यस्तरीय बैठकीत 200 कोटी अतिरिक्त मागणीस मान्यता देण्यात आली.
नाविन्यपूर्ण योजना-
• विद्यामंदिर यादववाडी, ता. करवीर या जिल्हा परिषद शाळेच्या स्मार्ट टू ग्लोबल स्कुल या प्रकल्पासाठी निधी
• इन्हेंशन, इनोव्हेशन आणि इनक्युबेशन सेंटर सुरु करणे
• खेळाडुंना आंतरराष्ट्रीय क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देणे
• भवानी मंडप येथील क्रीडा स्तंभाचे सुशोभिकरण करणे
• कोल्हापूर विमानतळाचा विकास
एक लाखाहून अधिक भाविक भेट देत असलेल्या यात्रा स्थळांना ‘क’ वर्ग मान्यता
• महादेव मंदिर, तासगांव ता. हातकणंगले
• विठ्ठल रुक्मिणी मंदिर, खेबवडे ता. करवीर
• गणेश मंदिर, ऐणापूर ता. गडहिंग्लज
कोविड नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात आजपासुन ज्येष्ठ नागरिक, फ्रंट लाईन वर्कर्सना लसीचा बुस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनापासून संरक्षणासाठी ‘लस हेच कवचकुंडल’ असून सर्व नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घ्यावेत.
या बैठकीला ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार जयंत आसगावकर, आमदार पी.एन. पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार राजू आवळे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, आदी प्रत्यक्ष तर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व अधिकारी ऑनलाईन सहभागी झाले होते.