आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
यावेळी, कोल्हापूर शहरातील कोरोनाची सद्य परिस्थिती व महानगरपालिकेमार्फत शहरामध्ये विशेषत: राजारामपुरी, कसबा बावडा, शाहूपुरी, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, फुलेवाडी आणि ताराबाई पार्क या कोरोना हॉटस्पॉट ठिकाणी राबविण्यात येणाऱ्या उपयोजनांबद्दल सविस्तर माहिती घेऊन आवश्यक सूचना केल्या.
कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी कोरोना बाधित रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवणे, स्वॅब दिलेल्या संशयित रुग्णांवर लक्ष ठेवणे, रुग्णांपर्यंत तात्काळ पोहचणे, नागरिक स्वॅब तपासणी करून घेत नसतील तर त्यांचे प्रबोधन करणे गरजेचे असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जी न करण्याबाबत तसेच ज्या रुग्णांना तात्काळ उपचाराची गरज आहे व रात्री अपरात्री येणाऱ्या रुग्णांवर वेळेत उपचार करण्यासाठी बेडचे योग्य नियोजन करण्याच्याही सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
कोरोनाच्या या काळात महापालिकेचे काम चांगल्या पध्दतीने चालू आहे, पण, स्वतःची काळजी घेऊन, कामाची आणखी थोडी गती वाढवून कोल्हापूरातून कोरोनाला लवकरच हद्दपार करूयात.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हे अभियान सुरू केले आहे. आज या अभियानाच्या प्रबोधन पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी उपमहापौर संजय मोहिते, अतिरिक्त पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, गटनेता शारंगधर देशमुख, उपायुक्त चेतन कोंडे, महिला आणि बालकल्याण समिती सभापती शोभा कवाळे, शिक्षण समिती सभापती श्रावण फडतारे, नगरसेवक राहुल चव्हाण, नियाज खान, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
– ना. सतेज (बंटी) डी. पाटील
पालकमंत्री, कोल्हापूर