कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून केएमटी बसमध्ये फिरते ताप क्लिनिकचे (क्लिनिक ऑन व्हीलचे) उदघाटन करण्यात आले. कोल्हापुरातील ज्या नागरिकांना रुग्णालयामध्ये जाण्यासाठी अडचण आहे अशा सर्व नागरिकांना या फिरत्या दवाखान्याची सुविधा उपलब्ध असेल.
यामध्ये, वैद्यकीय सर्व सुविधा, ऑक्सिजन, आवश्यक असलेली सर्व औषधे, हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर आदी सुविधा या माध्यमातून उपलबध असतील. तसेच, स्वॅब घेण्याची व्यवस्थाही या बसमध्ये केली जाणार आहे. त्यामुळे अडचणीच्या ठिकाणी नागरिकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मदत होणार आहे.
त्याचबरोबर, कोरोनासंदर्भात जनजागृती करण्यासाठी बसवर कोरोनाची लक्षणे, घ्यावयाची दक्षता, प्रतिबंधात्मक उपाय अशा विविध आशयाची माहिती चित्रमय स्वरूपात रेखाटण्यात आली आहेत.
यावेळी, आमदार ऋतुराज पाटील, महापौर निलोफर आजरेकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, सीईओ अमन मित्तल, प्रादेशिक परिवहन अधिकारी स्टीव्हन अलवारीस, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती संदीप कवाळे, परिवहन समिती सभापती प्रतिज्ञा उत्तुरे, गटनेते शारंगधर देशमुख, आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.