केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री मा. रविशंकर प्रसाद जी यांच्याशी आय.टी. क्षेत्रासंदर्भातील बैठक

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री मा. रविशंकर प्रसाद जी यांच्याशी आय.टी. क्षेत्रासंदर्भातील बैठक

आज केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री मा. रविशंकर प्रसाद जी यांच्याशी आय.टी. क्षेत्राची सद्यस्थिती व कोरोना नंतरच्या काळातील रोडमॅप निश्चित करण्यासंदर्भात व्हिडीओ कॉन्फरनसिंगद्वारे संवाद साधला. यावेळी आय.टी. क्षेत्राची भविष्यातील वाटचाल व धोरणे या संदर्भात खालील सूचना केल्या.

१) कोरोनामुळे भविष्यात निदान आय.टी. क्षेत्रात तरी घरातूनच काम करणे (वर्क फ्रॉम होम) ही नित्याची गोष्ट होवून जाईल. त्यामुळे राज्यात खाजगी माहितीची सुरक्षितता , विनाअडथळा इंटरनेट सेवा देणारे नेटवर्क यांची पूर्तता करण्याचे आवाहन मोठे असेल. या सर्वांचा विचार करुन या संदर्भातील पायाभूत सुविधा उभारायाला हव्यात व घरातून काम करण्याबाबतच्या नवीन नियमावली तयार करण्यावर भर दिला पाहिजे.

२) येणाऱ्या काळामध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये डिजीटलायझेशनची वाढ होणार आहे. अशावेळी सायबर गुन्ह्यांचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याबाबत पूढाकार घेवून ही समस्या सोडविण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यायला हवेत.

३) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक नवउद्यमींनी ए.आय. (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) / रोबोटिक्स आणि हेल्थकेअर क्षेत्रात बरचे नवीन संशोधन केले आहे. या सारख्या नवउद्यमींना किंवा संशोधन संस्थांच्या मार्फत केल्या जाणाऱ्या नवनवीन शोधांची उपयुक्तता तपासणे तसेच त्यांना मंजूरी देऊन ते प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र सरकारने एक खिडकी योजना आखावी. जेणेकरुन नवनवीन संशोधन करण्यासाठी संशोधकांना प्रोत्साहन मिळेल व त्यांच्या संकल्पना लवकरात लवकर प्रत्यक्षात आणता येतील

४) भविष्यात व्हर्च्युअल शिक्षण हे अधिक सोयीचे असेल . पण, सद्या यासाठी वापरत असलेल्या तंत्रज्ञानामध्ये माहिती सुरक्षिततेबाबत काही त्रुटी समोर आल्या आहेत . यावर उपाय म्हणून जर केंद्र शासनाने यासंदर्भात काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली तर ते सोयीचे ठरेल . शिवाय दूरशिक्षण क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याला चालना दिली पाहिजे. तसेच, देशातील सर्व सहकारी, जिल्हा परिषद शाळांमध्ये या संदर्भातील मूलभूत सुविधा मोफत उपलब्ध करून द्यावी.

५) केंद्र शासनाने “आधार” वर आधारित डिजिटल पेमेंट सिस्टिम वापरण्याला प्रात्साहन द्यावे.

६) भारत नेट 2 हा उपक्रम महाराष्ट्र राज्य उत्तमरित्या राबवत आहे. पण याला अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र शासनाचे मार्गदर्शन व मदतीची गरज आहे. त्यामुळे केंद्र सरकारला विनंती आहे की, या संदर्भातील निधी राज्य शासनाला तात्काळ देवून सहकार्य करावे.

७) देशातील विविध राज्यांच्या आय टी मंत्र्यांची एक कमिटी स्थापन करुन कोरोना नंतरच्या काळातील आय.टी. क्षेत्रासमोरील आव्हानांबाबत एक सविस्तर मसुदा तयार करावा. जो या येणाऱ्या काळामध्ये नवीन उपाययोजना व धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरेल.

८) महाराष्ट्र राज्य हे मुंबईला फिनटेक कॅपिटल म्हणून उभारण्याचा प्रयत्न करीत आहे. जागतिक बाजारपेठमधील गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी आमचे सध्या प्रयत्न सुरु आहेत कारण त्यासाठी सध्याचे संकट हे एक संधी आहे. आम्हाला खात्री आहे की केंद्र सरकार म्हणून यामध्ये आपले मोलाचे सहकार्य आम्हाला मिळेल.

या व्हिडीओ कॉन्फरनसिंगमध्ये तेलंगणाचे माहिती तंत्रज्ञान मंत्री के.टी. रामाराव यांनी मांडलेले खालील मुद्दे तितकेचे महत्वाचे आहेत.

अ) भारतीय आयटी इंडस्ट्री ही सर्वाधिकपणे परदेशी ग्राहकांवर अवलंबून आहे. पण कोरोना महामारीमुळे परदेशातल्या व्यवसायावर अवलंबून असणारे आयटी क्षेत्र अडचणीत आले आहे. त्यामुळे देशांतर्गत वापरासाठीच्या आय टी क्षेत्रावर भर देणे व या क्षेत्रामध्ये “मेक फॉर इंडिया” ला चालना देणे गरजेचे आहे

ब) अमेरिकेप्रमाने आपल्याकडेही ई-गव्हर्नन्स कार्यपध्दती राबवित असताना शासनाच्या सर्व विभागांमध्ये समन्वय असण्याबरोबरच खाजगी क्षेत्राशीही सलग्नता आवश्यक आहे. त्याचबरोबर सत्या नाडेला, सुंदर पिचाई यांच्यासारखे मूळ भारतीय असणाऱ्या जागतिक दर्जाच्या इतर आयटीतील तज्ज्ञांना सोबत घेवून कोरोना नंतरच्या युगातील आयटी क्षेत्रासंदर्भातील नवीन रणनीती तयार करण्यासाठी प्राधान्य द्यावे.

क) कोरोनामुळे भारतासमोर अनेक संधी आज दार ठोठावत उभ्या आहेत. गरज आहे ती या संधींच सोन करुन भारताला नवी उभारी देण्याची.

आय टी क्षेत्राबद्दल ही चर्चा घडवून आणल्याबद्दल केंद्रीय मंत्री मा. रविशंकर प्रसाद जी यांचे मनापासून आभार.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email