कोल्हापूर शहराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून आज काळम्मावाडी जलाशयाजवळ सुरु असलेल्या जॅकवेल आणि इंटेक वेल कामाच्या सद्यस्थितीची सविस्तर पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.
काळम्मावाडी थेट पाईपलाईन पाणी योजनेच्या एकूण कामांपैकी ८२ टक्के काम पूर्ण झाले असून जॅकेवेल आणि कनेक्टिव्हिटीसह उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत अशी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी केल्या. तसेच, इंटेकवेलमध्ये सध्या धरणातील पाणी आल्याने याचे डीवॉटरिंग करण्यासंदर्भातही माहिती घेतली. डिसेंबर महिन्यात पाऊस लागल्याने कॉपर डॅम फुटल्याने इंटेकवेल पाण्याने भरला असून इंटेकवेलचे डी-वॉटरिंग करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
इन्स्पेशनवेलचे काम पूर्ण झाले असून जॅकेवेलचे ६ मीटरचे काम सुद्धा पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर पाण्याच्या टाकीचे काम ७० टक्क्यांहुन अधिक झाले असून या योजनेच्या एकूण ५२.९७ किलोमीटर पाईपलाईन टाकण्याच्या कामापैकी ५१.२ किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. महावितरणचे २७ किलोमीटर पैकी १७ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून या योजनेच्या कामाला गती देण्यासाठी मनुष्यबळ वाढविण्यात येणार आहे. जॅकवेल आणि कनेक्टिविटीचे काम पूर्ण करण्याबरोबरच या योजनेचे उर्वरित काम लवकरात लवकर कसे पूर्ण होईल यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधितांना यावेळी केल्या.
आतापर्यंत या काळम्मावाडी थेट पाईपलाईन पाणी योजनेचे एकूण ८२ टक्के काम पूर्ण झाले असून दिलेल्या सुचनेप्रमाणे दोन-तीन महिन्यात जॅकवेलचे काम व एप्रिलमध्ये इंटेकवेलचे काम पूर्ण होईल त्यानंतर आवश्यक सर्व तपासण्या करण्यात येणार आहेत.
यावेळी, आ. ऋतुराज पाटील, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, तहसीलदार मीना निंबाळकर, प्रकल्प अधिकारी राजेंद्र माळी, सहाय्यक अभियंता हेमंत जाधव, गटविकास अधिकारी संदीप भंडारी, पाटबंधारे विभागाच्या उपअभियंता भाग्यश्री पाटील, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख आणि मधुकर रामाणे आदी उपस्थित होते.